Monday, September 13, 2010

गणपति बाप्पा तूच सुखकर्ता आहेस.


गणरायाचे आगमन झालेले आहे. टाळ, झांजा, पखवाज, ढोल, ताशा अशा विविध वाद्यांच्या गजरात गणरायाची गाणी आणि आरत्या सुरू झालेल्या आहेत. विद्येसोबत गणरायही कलेची आराध्यदेवता आहे. लोकनायक, गणनायक गणेश नृत्य करीत असल्याचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतात. संत तुकाराम महाराजांनीही गणपतीवर केलेल्या अभंगात म्हटले आहे.

                                                                'नाचत आले हो गणपती
पायी घागु-या वाजती'

'गणराया लवकर येई भेटी सकळांशी देई' या अभंगात संत तुकारामांनी गणपतीच्या रूपाचे वर्णन केले आहे व पुढे 'विठ्ठल गणपती दुजा नाही' असे म्हटले आहे. गणपती हा नाचत येतो असे तुकारामांनी म्हटले आहे. यावरूनच गणपतीचे लोकरंगनायक, नर्तक हे रूप स्पष्ट होते. भेदिकाद्वारे आध्यात्मिक कुटे सादर करणारे कलगीपक्ष आणि तुरापक्षाचे शाहीर गणाच्या उत्पत्तीसंबंधीही परस्परांना कूट प्रश्न विचारीत असत हे पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्या गणांवरून स्पष्ट होते. 'गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणीप्रती' असे उत्तर दुसर्या एका गणातून भाऊ फक्कड यांनी दिले आहे. गणपती ही यक्षकुळातील देवता असल्याचे भाऊ फक्कड यांना ज्ञात होते. यावरून कलगी-तुर्याच्या या रचनाकारांची व्युत्पन्नता ध्यानी येते. गणांची निर्मिती करताना या गणाद्वारे परस्परांना आव्हान देण्याचा गानप्रकार म्हणूनही या रचनाकारांनी गणांचे उपयोजन केले. पठ्ठे बापूरावांचा हा गण पहा-

लवकर यावे सिध्द गणेशा
आतमधी कीर्तन वरूनी तमाशा
माझा भरवसा तुम्हावरी खासा
विघ्न पिटविशी दाही दिशा
झेंडा मिरवशी आकाश पाताळी
वैरी करिती खाली मिशा
पठ्ठे बापूराव कवीच्या कवनी
बाजारबुणग्यांचा झाला हशा

पठ्ठे बापूराव हे कलगीपक्षाचे शाहीर होते. त्यांनी या गणातून तुरेवाल्या शाहिरांना भेदिकाच्या लढतीत नामुष्की पत्करावी लागेल असा हल्ला चढविला आहे. 'वैरी करिती खाली मिशा' ही ओळ त्याचेच द्योतक आहे. तुर्रेवाल्यांना 'बाजारबुणगे` असे संबोधून त्यांचा हशा झाला असल्याची प्रतिक्रिया पठ्ठे बापूरावांनी नोंदविली आहे. अषा रितीने गणांच्या निर्मितीतही कलगी-तुरा संघर्षाचे नाटयमय सूचन झालेले आहे. जागरणासारख्या विधिनाटयांमधून अशा स्वरूपाचे गण सादर होतात, पण भेदिकाच्या लढतीचे स्वरूप तेथे नसते. तर गणपतीचे संकीर्तन एवढाच मर्यादित हेतू असतो.
गणांतील गणपती हा कधी बालरूपात, कधी विद्येचा अधिपती, कधी सकळ कलांचा अधिपती, कधी विघ्नविनाशक अशा स्वरूपांत येतो. या गौरीनंदन अशा गणपतीचे शंकरराव जाधव-धामणीकर यांनी शब्दबध्द केलेले रूप् पाहा-

आज वंदन करितो, गौरी नंदना
नवविध विद्या करितो भक्ती
भक्तासी द्यावी मुक्ती
हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा।।१।।
चौदा विद्येचा गणपती । चौसष्ट कला तुझे हाती
बालकासी द्यावी स्फूर्ती । गावया गुणा ।।२।।
नमो तुज सरस्वती । ब्रम्हा वीणा घेऊन होती ।
स्वर गायनाने डुलती सभा रंगणा
शाहीर शंकर करी गर्जना । रक्षी रक्षी भक्ता जना ।
बबन नामदेव दावा । अंतरी खुणा

गौरीच्या नंदनाची आराधना करताना भक्तही बालक होतात व 'बालकासी द्यावी स्फूर्ती` असे आशीर्वचन मागतात.
गणपती 'विघ्नहार्ता' असल्याने तो रणात निश्चित तारून नेईल अशी श्रध्दा गणाद्वारे व्यक्त केली जाते. गणपतीचे योध्दा म्हणून असलेले रूप् मार्तंड भैरव व मणिमल्ल दैत्यांच्या युध्दात आपण आधी पाहिले आहेच. उल्कामुख दैत्याचा वध करणारा गणपती रणात रक्षण करील या श्रध्देपोटी शंकरराव जाधव-धामणीकर यांनी रचलेल्या गणातील हे वर्णन पहा.-

या गणा या या रणा या । विघ्न हारा या तुरा या ।।धृ।।
तुझ्याच स्मरणी जग हे तरले । अखंड व्यापुनी त्रिखंड उरले ।
दुखंड मनाला कधी न पुरले । पाखंड मनाला माराया ।।१।।
काम, क्रोध अनिवार । होतो मजवर मारा फार ।
पडेल कार्याचा हा भार । जडल रोग तो बाराया ।।२।।
ऋध्दी-सिध्दीचा तू सागर । दु:ख क्लेश हाराय ।
विकल्पबुध्दीचा हा घोर । ज्ञान अमृत पाजावा ।।३।।
कवि शंकर म्हणे कृपासिंधु । दीननाथा दीन बंधू ।
वारंवार तुजशी वंदू । दु:ख क्लेश हाराया ।।४।।

गणांच्या सादरीकरणामागे जे आशयसूत्र दिसते ते असे-

१) कार्यारंभी गणाचे वंदन आशीर्वचन प्राप्तीसाठी करावे.
२) गणेश ही सकल कलांची देवता आहे. कलेच्या प्रारंभीच या देवतेकडून रंगउर्जा घ्यावी.
३) अरिष्टांचे निवारण व्हावे म्हणून गणपतीचा धावा करावा. ही अरिष्टे दोन प्रकारची असतात. भौतिक पातळीवरची आणि आधिभौतिक पातळीवरची. भौतिक अरिष्टे म्हणजे आर्थिक आपत्ती, रोगराई इत्यादी व आधिभौतिक आरिष्टे म्हणजे काम, क्रोध आदी शड्रिपूंपासून अभय प्राप्त व्हावे म्हणून गण सादर करणे.
४) गणातून 'गणा'शी आणि 'गणां'शी संवाद. गण म्हणजे व्यक्तींचा समूह. या समूहाशी संवाद साधण्याचा आरंभ गणाद्वारे व प्रत्यक्ष गणपतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक गणांमध्ये सादरकर्ता, म्हणजेच उपासक येथे गणपतीशी संवाद साधतोय व आशीर्वचन मिळतेय हे आशयसूत्र असते.

गोधळ, जागरण, तमाशा आदी लोककला प्रकारांत संकीर्तन स्वरूपातील 'गण` दशावतार, लळीत यासारख्या भक्तिनाटयात प्रत्यक्ष स्वरूपात अवतरतो. हा गणेश 'नृत्यगणेश' होय.

प्रा.डॉ. प्रकाश खांडगे
महान्यूज'मधील मजकूर.

No comments:

Post a Comment