Friday, November 5, 2010

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आपल्या जीवनाला आनंद देईल.



दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.

प्रश्न- दिवाळी या सणाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा काय आहे? 
उत्तर- आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत.
आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आहोत. 
आपली दिवाळी पाच दिवसांची असते. पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि आरोग्याकरिता धन्वंतरीची जयंती साजरी करुन आपण या सणाचा शुभारंभ करतो.हे खरेच आहे. आयुष्याचा उपभोग व्यवस्थित घ्यायचा असेल, दारिद्य, चिंता, अस्वस्थता अशा गोष्टींचा काळोख दूर करावयाचा असेल, तर आधी प्रकृती चांगली असली पाहिजे, पुरेसे आयुष्य लाभले पाहिजे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी प्रत्यक्ष यमराजा आणि देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे स्मरण करतो. दुसर्‍या दिवशी नरकचतुर्दशीच्या प्रभाती भगवान श्रीकृष्णाचा एक महान पराक्रम आपण आठवतो. नरकासुराचा वध करुन अमंगल, अशुचि प्रवृत्तीच्या दुष्टदुर्जनांचे निर्दालन करण्याचा संकल्पच आपण एक प्रकारे मनोमन सोडतो.

त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस. चिरकाल अर्थसंपन्नता लाभावी, लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहावी म्हण्नू आपण लक्ष्मीचे पूजन करतो, प्रार्थना करतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असताना ज्याला शेतकर्‍यांचा राजा म्हणून गौरविले आहे त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सवदिन आपण मानतो. व्यापार, उद्योग यांचे नवे वर्ष त्या दिवसापूसन सुरु होते. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी व्यापारे वसते लक्ष्मी । हे वचन सार्थ करण्यासाठी लक्ष्मीपूजनानंतर लगेचच लक्ष्मीने व्यापारात यश द्यावे म्हणून आपण व्यापाराच्या नव्या वर्षाचे नवे पर्व सुरु करतो. 

बलिप्रतिपदेच्या नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. दिवाळीच्या प्रारंभी धनत्रयोदशीला यमराजाच्य नावाने दिवे लावून आपण यमराजाचे एक प्रकारे स्वरण केले. आपण भाऊबीजेला यमव्दितीया असे म्हणतो. कारण यम आपल्या बहिणीकडे या दिवशी भोजनास गेला अशी श्रद्धा आहे. या दिवशी बहीण असलेल्या कोणाही भावाने आपल्या घरी भोजन न करता बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे, अशी परंपरा आहे. म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आरोग्य, पराक्रम, धनसंपदेची उपासना, व्यापार, उद्योग आणि भाऊ-बहिणीच्या गोड पारिवारिक नात्याचा मधुर संगम असे पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो.

प्रश्न- दिवाळी हा सण एîक्याचा सण आहे यामध्ये धार्मिक आचारणाला किती महत्त्व आहे का? 
उत्तर दिवाळीत धार्मिक आचारणाला महत्त्व तसे कमी असले, तरी धार्मिक श्रद्धेचा पाया आरोग्याच्या, धन-स्वास्थ्याच्या, व्यापार-उद्योगाच्या आणि कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने मजबूत होण्यासाठी दिवाळीच्या सणातील प्रत्येक गोष्ट ही जणूकाही आखून ठरवून दिली आहे. या सर्व उत्सवामध्ये अधिक महत्त्व आहे ते दिव्यांच्या रोषणाईला, दिव्यांच्या सजावटीला, दिपांच्या मालिकांना, दीपावलीला. म्हणून या सणाला आपण दिवाळी च म्हणतो.

दीपमाला उजळवून, दिव्याच्या आरास करुन, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी, दिवाळी हा चिंता - विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे. विक्रम संवताचे नवे वर्ष सुरु होताना सर्व आसमंत तेजाने उजळून टाकणारा, दाहीदिशांतून दरवळणार्‍या सुंगधाने मनामनात प्रसन्नतेची कारंजी फुलविणारा सण आहे. फराळांच्या गोड पदार्थांनी गोड झालेल्या तोंडाने परस्परांना गोड गोड शुभेच्छा देण्याघेण्याचा हा आणि यासारखा हाच सण आहे. 

प्रश्न- दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे असले तरी पर्यावरणसंवर्धनासाठी हा सण कसा पूरक आहे? 
उत्तर- प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, प्रदूषण, प्लॉस्टिकसारख्या पर्यावरणाला अडचणीत टाकणार्‍या उत्पादनांची गर्दी अशा अनेकविध कारणांमुळे सध्या जागोजागी स्वच्छता मोहिमा उघडल्या जातात. आपले शरीर स्वच्छ ठेवा, आपली कॉलनी स्वच्छ ठेवा, अशा स्वरुपाच्या प्रचारमोहिमा वारंवार राबविल्या जातात. 

तथापि, असे कोणी माहिमेतून न सांगताच आपण परंपरेने दिवाळीपूर्वी एक स्वच्छता मोहीम घराघरातून हाती घेत असतो. गृहिणी मोठय़ा उत्साहात घरातील केरकचरा काढण्याच्या आणि साफसफाईच्या कामाला लागलेल्या दिसतात. परंपरेचे महत्त्व आहे ते इथेच. सफाई आणि स्वच्छता करा, असे फलक लावावे लागत नाहीत. दसरा झाला की, प्रत्येक दक्ष गृहिणी या साफसफाईचे वेध लागतात. ही साफसफाई का केली जाते ? 

दिवाळीत लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे, त्या वेळी सगळे घर कसे लखलखीत स्वच्छ असावे, त्यामध्ये देवीने आपल्या भक्तांना , मी तुमच्या गावी यायला तयार आहे. पण गाव सर्व स्वच्छ झाले पाहिजे, गावात कुठेही केरकचरा आढळता नये, असे सांगितले असल्याचे संदर्भ सापडतात. आपल्याकडे स्वच्छतेचे महत्त्व पूर्वीपासून जाणले गेले आहे. स्वच्छता म्हणजे मनाची आणि शरीराचीसुद्धा.

प्रश्न- सामाजिक आनंदाची उधळण करणारा हा सण काय संदेश देतो? 
उत्तर- दिवाळीत कौटुंबिक आणि सामाजिक आनंदाची देवाणघेवाण करुन आपण एकमेकांबद्दल मनात असेलेली किल्मिषे, दुजाभाव दूर करुन मने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, निदान तो केला जावा, अशी अपेक्षा असते आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी या दीपावलीच्या मंगल दिवसांत रोज अभ्यंगस्नान परंपरेने सांगितले आहे. दिवाळीपासून थंडी विशेष प्रमाणात वाढू लागते. म्हण्नू अंगाला तेल लावून केलेले स्नान आपली त्वचा थंडीमुळे शुष्क होऊ देत नाही. यासाठी दिवाळीत तेलाने अंगमर्दन करुन नंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे. 

आपल्याकडे स्नानाला विशेष महत्त्व आहे. इतर अनेक धर्मात आणि धर्मग्रंथतत ते ते कधी आठवडय़ातून एकदा स्नान, तर कधी नुसतेच कोपरापर्यंत हात आणि पाय धुणे, तर कधी थंडीमुळे स्नानाला फाटा देऊन नुसते अंग पुसून घेणे, असे विविध आचार रुढ झाले. मात्र आपल्याकडे आंघोळीसाठी पुरेसे पाणी सगळीकडे नसले तरी बर्‍याच जागी उपलब्ध होते. मुळात आपल्या पूर्वजांनी वस्ती केली ती नदीच्या व जलाशयाच्या काठावरच. माघस्नान, कार्तिकस्नान अशा विविध प्रकारच्या स्नानपरंपरा आपल्याकडे आहेत. ही स्नानपरंपरा नदीवर जाऊन आंघोळ करणे उत्तम, विहिरीतील पाणी आणून केली जाणारी आंघोळ त्यापेक्षा कमी दर्जाची, तर घरात साठविलेल्या पाण्याची आंघोळ ही आणखी कमी दर्जाची. अशा स्वरुपाची फले याबाबतीत सांगितलेली आहेत. त्यामागे हेतू काय ? प्रत्येकाने आंघोळ व्यवस्थित करावी. नदीवरची आंघोळ सर्वात चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा त्यामागे विचार असावा.

एक गोष्ट निश्चित, दीपावली सणाच्या निमित्ताने स्वच्छतेचे, शुद्धतेचे महत्त्व अखिल समाजाच्या मनावर बिंबवणे, असा प्रयत्न आपल्या संस्कृतिने केला आणि तो शेकडो नव्हे, हजारो वर्षे टिकवून धरला. ही स्वच्छता केवळ हिंदूनीच करावी असे नव्हे. हिंदू धर्मातील एखादा चांगला आचार सर्वांनीच अनुसरला तर त्यात काही बिघडत नाही. हिंदू धर्मातील आचार आपण इतरांना सांगितले तर तो मोठा गुन्हा होईल, अशी समजूत बाळगण्याचे कारण नाही. दीपावलीतील लक्ष्मीपूजन सर्व धर्माचे लोक आपापल्यापरीने साजरे करतात. मग स्वच्छतेच्या मोहिमा आखणार्‍यांनी दीपावलीच्या सणाच्या मागचे हे स्वच्छतेचे आणि साफसफाईचे तत्त्व ध्यानी घेऊन पावसाळ्यानंतर दिवाळीनिमित्त सर्वत्र शहरे, रस्ते, गल्ल्या साफसूफ केल्या तर ते चांगले होईल. यंदा जमले नाही तर पुढल्या वर्षी. आणि अर्थातच जुन्या समजुतीप्रमाणे संपन्नतेची देवी अशा ठिकाणी निश्चितच वास्तव्याला येईल, यात काय संशय ? 
आपल्या प्रकाशाने सारा अंधार मिटवून प्रकाशाकडे म्हणजे सुख-समृध्दीकडे नेणारा हा सण उजळणार्‍या दिव्याप्रमाणेच लेखानीचा प्रकाश अन्याय अज्ञानाचा अंधकार दूर करतो. त्याप्रमाणेच आपल्या सर्वांच्या जीवनातही दिवाळी फुलवेलं प्रकाश सौख्याचा ! शुभेच्छा !!!...

'महान्यूज'मधील मजकूर