Saturday, October 30, 2010

एका वैचारिक क्रांतीचा प्रवास : नैसर्गिक धर्मशास्त्र ते नैसर्गिक निवड

चार्ल्स डार्विन यांच्या १९ व्या शतकातील उत्क्रांतीविषयक सिद्धांतांनी सर्व प्रस्थापित विचारांना आणि सत्ताधारी वर्गानाही प्रचंड धक्का दिला. या सत्ताधारी वर्गात सर्वात प्रमुख प्रवाह होता तो धर्मपीठांचा. विज्ञानविश्वात तोपर्यंत फिजिक्स झपाटय़ाने प्रगत होत होते. परंतु जीवसृष्टीचा अभ्यास करून उत्क्रांतीविषयक सिद्धांताने फिजिक्सने आखून दिलेल्या सीमाही ओलांडल्या. तेव्हापासून आयझ्ॉक न्यूटननंतर चार्ल्स डार्विन यांचे नाव क्रांतिकारक वैज्ञानिक म्हणून घेतले जाऊ लागले. डार्विन यांचे एक स्वतंत्र आणि समांतर विचारपीठच निर्माण झाले. जवळजवळ शंभर वर्षे या डार्विन पीठाचा दबदबा इतक्या प्रचंड प्रमाणात होता की त्याला आव्हान देणारे प्रतिगामी व सनातनी म्हणून संबोधले गेले. परंतु गेल्या काही वर्षांत विश्वाच्या उत्पत्तीविषयी, जीवसृष्टीच्या निर्मितीविषयी आणि उत्क्रांतीविषयी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे सिद्धांत निर्माण होऊ लागले. या पाश्र्वभूमीवर माजी खासदार प्रदीप रावत यांनी भाषांतरित केलेला कॅलिफोर्निया विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ इकॉलॉजी अ‍ॅण्ड इव्होल्यूशनरी बायॉलॉजीचे प्रा. फ्रान्सिस्को जे. आयला यांच्या विवेचनाचा हा स्वैर अनुवाद...

Sunday, October 10, 2010

युथफूल महासंस्कृती-६ : माय मराठीला लाभणार ग्लोबल चेहरा

राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख, इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशातील प्रतिनिधी यांच्या समवेत होणाऱ्या अधिकृत बैठका, कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची, अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होईल, मराठी भाषकांचे अनुवादकौशल्य विकसित करण्यासाठी चालना मिळेल आणि मराठी भाषकांना अनुवादक म्हणून व्यवसायही प्राप्त होईल.

उद्योजक व्हा!

परंपरागत व्यवसायाच्या क्षेत्रामधील संधींच्या अभावामुळे अनेक तरुणांना स्वत:चे उद्योग निर्माण करून उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागले आहे. ज्यांना नोकरीधंदा मिळू शकला नाही ते आपल्या स्वत:च्या कौशल्याचा व कसबाचा उपयोग करून नवीन रोजगार निर्माण करीत आहेत. याव्यतिरिक्त अनेक तरुण चांगली नोकरी सोडून स्वत:चे व्यवसाय सुरू करीत आहेत आणि हे क्षेत्र आज झपाटय़ाने विस्तारित होत आहे. दीर्घकाळामध्ये होणारे मोठे लाभ व आपली उद्दिष्टे ठरविण्याचे स्वातंत्र्य ही यामागची दोन प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

Thursday, October 7, 2010

आद्यशक्तीपीठ आई तुळजाभवानी !


तुळजापूर येथे नवरात्रानिमित्त विविध उत्सव आणि कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उत्सवास भक्तांची प्रचंड गर्दी असते. तुळजापूर शक्तीपीठाचा इतिहास आणि उत्सवाची माहिती जाणून घेणे प्रत्येकालाच आवडेल. या लेखात थोडक्यात त्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच राज्य शासन या तीर्थक्षेत्र विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही यात आहे.

तुळजापूरचे नाव ऐकलेले नाही, असा मराठी माणूस सापडणार नाही. खरे म्हणजे शेजारच्या आंध्र व कर्नाटकातही तुळजाभवानीचे हजारो भक्त आणि भाविक आहेत आणि ते नित्यनियमाने तुळजापुरात येत असतात. तथापि तुळजापुराशी मराठी मनाचे नाते काही विशेष असेच आहे.

इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे यांनी श्री तुळजाभवानी या शीर्षकाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यात तुळजापूर क्षेत्राची परंपरा एक हजार वर्षांहून जुनी असल्याचे नमूद केले आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. ते आद्यपीठ आहे. सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर बालाघाटच्या डोंगरात तुळजापूर वसलेले आहे. सोलापूर-तुळजापूर हे अंतर सुमारे ४५ कि.मी. तर उस्मानाबाद-तुळजापूर हे अंतर सुमारे २० कि.मी. एवढे आहे.

तुळजापूरचे प्रसिध्द मंदिर एखाद्या भूईकोट किल्ल्यासारखे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. गर्भगृह, गूढ मंडप आणि सोळा खांबी मंडपाच्या धर्तीवर बांधलेला सभा मंडप अशी विस्तीर्ण प्रकारातील भवानी मंदिराची रचना आहे. आतून अनेक ओवर्‍या बांधल्या असून मुख्य मंदिरातील भवानी ही अष्टभूजा महिषमर्दिनीच्या रुपात आहे. तिच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेली आहे. पाठीवर बाणाचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकलेला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. दोन्ही पायांच्या मध्यभागी महिषासुराचे शीर पडलेले आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या-डाव्या बाजूंना चिरंतनाची प्रतिके असलेले चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे भवानीचे वाहन आहे.

भवानी मंदिराच्या आवारात कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ आणि अमृतकुंड आहे. मंदिराबाहेर तुळजापुरात पापनाशी, मंकावती, नागझरी अशी तीर्थे आहेत. तुळजापुरात विविध मठही आहेत.

आपल्याकडील परंपरेत एकदा प्रतिष्ठापित झालेली मूर्ती सहसा हलविण्यात येत नाही. मात्र तुळजाभवानीची मूर्ती वर्षातून तीन वेळा हलविण्याची प्रथा आजही आहे. भाद्रपद वद्य नवमी ते अश्विनी शुध्द प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानीची मूर्ती शेज घरात असते. त्यानंतर देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु होतो. नवरात्रात सीमोल्लंघनानंतर अश्विन शुध्द दशमी ते अश्विन पोर्णिमेच्या पहाटेपर्यंत मूर्ती अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारहून आलेल्या पलंगावर निद्रिस्त असते. याशिवाय पौष अमावस्येपासून पौष शुध्द अष्टमीच्या पहाटेपर्यंत देवी शेज घरात निद्रिस्त असते. त्यानंतर शाकंभरी नवरात्र सुरु होते.

तुळजाभवानी मंदिरास अनेक राजे-राजवाडय़ांनी योगदान दिले आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली सोन्याच्या मोहरांची माळ आजही देवीच्या गळ्यात असते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भक्तांसाठी विहीर खोदून दिली. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत तुळजापूरचे मंदिर, तेथील तुळजाभवानी, भवानीचा पराक्रम, भवानीने पराक्रमासाठी इतरांना दिलेली प्रेरणा अशा बाबींचे उल्लेख होतात. मराठी साहित्यातही याबाबी विविध पोवाडय़ांतून तसेच काव्यातून दिसून येतात. तुळजाभवानी ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान राहिली आहे. समर्थ रामदासांच्या रचनांतूनही तुळजाभवानीचा महिमा वर्णन करण्यात आलेला आहे.

दरवर्षी अक्षरश: शेकडो भाविक तुळजापुरात येतात. मंदिरापर्यंत पायी चालत येणारे कितीतरी भाविक आहेत. विशेषत: अश्विनी पौर्णिमेला पायी येणार्‍या भाविकांची उदंड गर्दी होते. त्यांच्या सोयीसाठी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सोलापूर-तुळजापूर व उस्मानाबाद-तुळजापूर रस्ता वाहनांसाठी बंद करण्याची वेळ येते.

अशा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले असून त्यामार्फत मंदिर तसेच शहर विकासाची विविध कामे हाती घेतली जात आहेत. या कामांवर राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्राधिकरणाच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी सुनील यादव आदींनी प्राधिकरणाच्या कामाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

तुळजापुरात येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी आता पाच मजली दर्शनमंडप बांधून तयार आहे. या दर्शन मंडपात एकावेळी सुमारे दहा हजार भाविक रांगेत राहू शकतील. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी व अन्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

'महान्यूज'मधील मजकूर.

नवरात्र उत्सवास प्रारंभ..


शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.

महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी अध्यात्मगंगेच्या अमृतजलाचे घट सातशे वर्षापूर्वीच बसविले. शासदीय नवरात्रात ज्ञानेश्वरमाऊलींनी अठरा अध्यायाचे अठरा घट बसविले. ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेव महाराज यांनी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत कीर्तनाचे रंगी नाचत भावभक्तीचा अखंड नंदादीप महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात तेवत ठेवला. तो तेव्हापासून अजूनही अखंडपणे तेळाळत आहे आणि या पुढच्या काळातही तो तसाच प्रकाशमान होत राहणार आहे.

नवरात्रात नवे धान्य रुजविले जाते. महाराष्ट्राच्या भूमीत नवे विचार रुजणे गेल्या कित्येक शतकांपासून अखंडपणे सुरु आहे. अनेक साधुसंतांनी, तत्त्ववेत्यांनी आणि विचारवंतांनी या महाराष्ट्र शारदेच्या मंदिराच्या गाभार्‍यात विविध विचारसुगंधाची, विविध दृष्टिकोनांच्या रंगांची मनोहर लक्षावेधी शब्दसुमने गुंफलेल्या माळाही बांधल्या. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी एकेक माळ बांधली जाते. येथे असा हिशेब न मांडता सातत्याने अखंड माळा बांधल्या गेल्या.

श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती या तिन्ही देवी त्रिगुणात्मिका मानल्या जात असल्या तरी महाकाली ही तामस गुणाची म्हणून विशेषकरुन ओळखली जाते. सत्त्व म्हणजे रज या दोन्ही गुणांबद्दल आपण विचार करु लागलो की, महालक्ष्मी ही राजस म्हणजे रजो गुणाची आणि सरस्वती ही सात्त्विक म्हणजे सत्त्व गुणाची मानली जावे असे स्वाभाविक वाटते. पण कित्येक शास्त्रकारांनी सरस्वतीला रजोगुणाची आणि लक्ष्मी सत्त्व गुणाची मानली आहे. महाकाली ही दुष्टदुर्जनांपासून संतसज्जनांचे रक्षण करते. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तिनेही दुष्टदुर्जनांचा नायनाट करण्यासाठी आपण पुन:पुन्हा अवतरु असे आश्वासन दिले आहे.

दुरितांचे तिमिर जावो। या हेतूने प्रत्यक्ष रणांगणावर मदोन्मत्त असुरदैत्यांना यमसदनी पाठविण्यास महाकाली निरंतर सिद्ध आणि तत्पर आहे. विश्व स्वधर्मसूर्य पाहो। असा सरस्वतीचा आग्रह आहे. स्वधर्म म्हणजे काय ? त्याचे पालन कसे करावे आणि स्वधर्माच्या सूर्याचा प्रकाश दाही दिशांत पसरण्यासाठी श्वेत पद्मासना, शुभ्र वस्त्रांकिता अशा सरस्वती अधिक योग्य नाही काय ? स्वधर्माचरण करण्यासाठी निष्ठेइतकीच विवेकाचीही आवश्यकता असते. विवेकबुद्धीला योग्य मार्गदर्शन सरस्वतीच्या कृपेशिवाय कसे मिळणार ? ज्ञान, बुद्धी, शिक्षण हे सर्व विषय सरस्वतीच्या अधिपत्याखाली नांदणारे. योग्य काय आणि अयोग्य काय, यांचे सम्यग् ज्ञान झाल्याशिवाय अखिल विश्व स्वधर्मसूर्याने उजळून कसे निघणार ? म्हणजे विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। हे दायित्व ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वतीलाच देणे अधिक योग्य होय आणि जो जें वांछिल तों तें लाहो । ज्याला जे हवे असेल, ते त्याला मिळावे, इच्छा असेल ते प्राप्त व्हावे, असे सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता देवी महालक्ष्मीवाचून दुसर्‍या कोणात आहे ? लक्ष्मीविना इहसौख्य सर्व भस्मतें असे कवींनी म्हटले आहेच.

दुष्टदुर्जनांचा नायनाट करुन जीवनाचा मार्ग निष्कंटक करणारी महाकाली, यमनियम पाळून तसेच स्वकर्तव्याचे भान ठेवून स्वत:बरोबर दुसर्‍याचाही विचार करुन जगावे कसे, त्याचे अचूक मार्गदर्शन करणारी महासरस्वती आणि ऐहिक वैभव तसेच सुखसमृद्धी देणारी महालक्ष्मी या तिन्ही देवता म्हणूनच परमवंद्य आहेत. नवरात्राच्या प्रारंभदिनी आपण या त्रिगुणात्मिका देवींच्या चरणी नतमस्तक होऊया.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
'महान्यूज'मधील मजकूर.

कॉमन 'समृध्दी'

कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये सहभागी झालेल्या ७१ लहान-मोठय़ा देशांना एकत्र आणणारा धागा आहे- इंग्रज वसाहतवादाचा वारसा.. ‘कॉमनवेल्थ’ चे समान सूत्र आहे, कला, क्रीडा, संस्कृती यांची ‘कॉमन’ समृद्धी.. ‘कॉमनवेल्थ’ या संकल्पनेला इतिहास आणि राजकारण यांचा पीळ आहे ..

Tuesday, October 5, 2010

आपल्याला माहित आहेत का बाबा आमटे ?

समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जाहगिदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.

बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.

१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताईं बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.

बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यांत झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जिणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.

आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. `आनंदवन'चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे.

समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. `ज्वाला आणि फुले' हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. `उज्ज्वल उद्यासाठी' हा काव्य संग्रह आणि `माती जागवील त्याला मत' ही त्यांची पुस्तकंही गाजली.

बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्‍यांसाठी दिला जाणारा सर्वोƒ पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना त्यांना १९८३ प्रदान करण्यात आला, १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं आणि `संयुक्त राष्ट्र'ने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. याही व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानीत केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांना `महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आलं.

गेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.

  • शुभांगी मांडे

    'महान्यूज'मधील मजकूर.