Thursday, October 7, 2010
आद्यशक्तीपीठ आई तुळजाभवानी !
तुळजापूर येथे नवरात्रानिमित्त विविध उत्सव आणि कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उत्सवास भक्तांची प्रचंड गर्दी असते. तुळजापूर शक्तीपीठाचा इतिहास आणि उत्सवाची माहिती जाणून घेणे प्रत्येकालाच आवडेल. या लेखात थोडक्यात त्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच राज्य शासन या तीर्थक्षेत्र विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही यात आहे.
तुळजापूरचे नाव ऐकलेले नाही, असा मराठी माणूस सापडणार नाही. खरे म्हणजे शेजारच्या आंध्र व कर्नाटकातही तुळजाभवानीचे हजारो भक्त आणि भाविक आहेत आणि ते नित्यनियमाने तुळजापुरात येत असतात. तथापि तुळजापुराशी मराठी मनाचे नाते काही विशेष असेच आहे.
इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे यांनी श्री तुळजाभवानी या शीर्षकाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यात तुळजापूर क्षेत्राची परंपरा एक हजार वर्षांहून जुनी असल्याचे नमूद केले आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. ते आद्यपीठ आहे. सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर बालाघाटच्या डोंगरात तुळजापूर वसलेले आहे. सोलापूर-तुळजापूर हे अंतर सुमारे ४५ कि.मी. तर उस्मानाबाद-तुळजापूर हे अंतर सुमारे २० कि.मी. एवढे आहे.
तुळजापूरचे प्रसिध्द मंदिर एखाद्या भूईकोट किल्ल्यासारखे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. गर्भगृह, गूढ मंडप आणि सोळा खांबी मंडपाच्या धर्तीवर बांधलेला सभा मंडप अशी विस्तीर्ण प्रकारातील भवानी मंदिराची रचना आहे. आतून अनेक ओवर्या बांधल्या असून मुख्य मंदिरातील भवानी ही अष्टभूजा महिषमर्दिनीच्या रुपात आहे. तिच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेली आहे. पाठीवर बाणाचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकलेला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. दोन्ही पायांच्या मध्यभागी महिषासुराचे शीर पडलेले आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या-डाव्या बाजूंना चिरंतनाची प्रतिके असलेले चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे भवानीचे वाहन आहे.
भवानी मंदिराच्या आवारात कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ आणि अमृतकुंड आहे. मंदिराबाहेर तुळजापुरात पापनाशी, मंकावती, नागझरी अशी तीर्थे आहेत. तुळजापुरात विविध मठही आहेत.
आपल्याकडील परंपरेत एकदा प्रतिष्ठापित झालेली मूर्ती सहसा हलविण्यात येत नाही. मात्र तुळजाभवानीची मूर्ती वर्षातून तीन वेळा हलविण्याची प्रथा आजही आहे. भाद्रपद वद्य नवमी ते अश्विनी शुध्द प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानीची मूर्ती शेज घरात असते. त्यानंतर देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु होतो. नवरात्रात सीमोल्लंघनानंतर अश्विन शुध्द दशमी ते अश्विन पोर्णिमेच्या पहाटेपर्यंत मूर्ती अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारहून आलेल्या पलंगावर निद्रिस्त असते. याशिवाय पौष अमावस्येपासून पौष शुध्द अष्टमीच्या पहाटेपर्यंत देवी शेज घरात निद्रिस्त असते. त्यानंतर शाकंभरी नवरात्र सुरु होते.
तुळजाभवानी मंदिरास अनेक राजे-राजवाडय़ांनी योगदान दिले आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली सोन्याच्या मोहरांची माळ आजही देवीच्या गळ्यात असते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भक्तांसाठी विहीर खोदून दिली. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत तुळजापूरचे मंदिर, तेथील तुळजाभवानी, भवानीचा पराक्रम, भवानीने पराक्रमासाठी इतरांना दिलेली प्रेरणा अशा बाबींचे उल्लेख होतात. मराठी साहित्यातही याबाबी विविध पोवाडय़ांतून तसेच काव्यातून दिसून येतात. तुळजाभवानी ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान राहिली आहे. समर्थ रामदासांच्या रचनांतूनही तुळजाभवानीचा महिमा वर्णन करण्यात आलेला आहे.
दरवर्षी अक्षरश: शेकडो भाविक तुळजापुरात येतात. मंदिरापर्यंत पायी चालत येणारे कितीतरी भाविक आहेत. विशेषत: अश्विनी पौर्णिमेला पायी येणार्या भाविकांची उदंड गर्दी होते. त्यांच्या सोयीसाठी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सोलापूर-तुळजापूर व उस्मानाबाद-तुळजापूर रस्ता वाहनांसाठी बंद करण्याची वेळ येते.
अशा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले असून त्यामार्फत मंदिर तसेच शहर विकासाची विविध कामे हाती घेतली जात आहेत. या कामांवर राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्राधिकरणाच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी सुनील यादव आदींनी प्राधिकरणाच्या कामाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
तुळजापुरात येणार्या भाविकांच्या सुविधेसाठी आता पाच मजली दर्शनमंडप बांधून तयार आहे. या दर्शन मंडपात एकावेळी सुमारे दहा हजार भाविक रांगेत राहू शकतील. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी व अन्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
'महान्यूज'मधील मजकूर.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment